वयाची सत्तरी ओलांडूनही दाम्पत्याची कोरोनावर यशस्वीरित्या मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 11:57 AM2021-05-10T11:57:08+5:302021-05-10T11:57:26+5:30
आध्यात्मिक चिंतनाने वाढवले मनोधैर्य
धायरी: कोरोनाने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. दर दिवशी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा आपल्या जीवाला घोर लावत आहे. अशा वातावरणात प्रदेश काँग्रेसचे सदस्य असलेल्या धायरी येथील श्रीरंग चव्हाण - पाटील यांनी सपत्नीक कोरोनाला हरवले आहे.
सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात अनेक जण आपल्यातून निघून जात आहेत. वेळेवर निदान होत नसल्ल्याने अनेक जण गंभीर अवस्थेत जात आहेत. बेड ,उपचार न मिळाल्याने मुत्यू होत आहे. धायरी परिसरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. अशा कठीण प्रसंगी धायरी येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य श्रीरंग चव्हाण पाटील व त्यांच्या पत्नी अलका यांनी धैर्याने तोंड देत कोरोनावर मात केली.
चव्हाण दांपत्याने वयाची सत्तरी ओलांडली आहे. चव्हाण - पाटील यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. फुफ्फुसालाही संसर्ग झाला होता. त्यानंतर पत्नी अलका यांनाही कोरोनाची लागण झाल्याने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दोघांवर उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दोन आठवड्यांच्या उपचारानंतर दोघेही ठणठणीत बरे होऊन घरी परत आले. हॉस्पिटलमध्ये असताना काही जवळच्या नातेवाईकांचे कोरोनाने निधन झाल्याचे समजल्यावर चव्हाण यांना अस्वस्थ वाटू लागे. त्यावेळी ते आध्यात्मिक चिंतनाने आपले मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
मला संसर्ग झाला हे मनात ठेवले नाही. मी बरा आहे, मला काहीही झाले नाही, असा सकारात्मक विचार सदैव मनात ठेवला. नागरिकांनी नियमांचे पालन करुन वेळीच खबरदारी, उपचार घेतले तर कोरोनाच्या संकटावर मात करता येते. कोणीही घाबरून जाऊ नये. आध्यात्मिक चिंतन केल्यास आपले मनोधैर्य वाढेल. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.