दुर्गेश मोरे
पुणे: ससून रुग्णालयाबाहेर तब्बल दोन कोटी ड्रग्ज पकडण्यात आले होते. त्यानंतर ड्रग्ज तस्करीचे संपूर्ण रॅकेट समोर आले. मात्र, त्याचा तपास होताना ससूनच्या परिसरातच गुरफटलेला दिसला. त्यावेळी हे ड्रग्ज पुण्यात कोणाला देण्यात येणार होते. असे प्रश्न विचारण्यात आले; पण त्याला बगल देण्यात आली. आजही तोच प्रश्न पुढे येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज वितरण केवळ कुरिअर कंपनीद्वारेच करणे शक्य आहे. मग पुण्याबाहेर असो की पुण्यातल्या पुण्यात. परवाच विश्रांतवाडी येथील प्रकरणात कुरिअरचालकाला अटक केली. मात्र, ससूनच्या ड्रग्ज प्रकरणात शहरातील एकाही कुरिअर कंपनीकडे चौकशी करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे हे पथकासह १ ऑक्टोबर २०२३ला गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस हवालदार चेतन गायकवाड यांना सुभाष मंडल हा दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी मंडल आणि ससून रुग्णालयाच्या उपहारगृहातील कामगार रौफ शेख याला अटक केली. कारागृहात ललितचा मंडलशी संपर्क आला होता, तर शेखचा रुग्णालयात असताना. याचाच अर्थ त्याच्या संपर्कातील व्यक्ती ड्रग्जच्या तस्करीत सहभागी झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता प्रश्न आहे की, येरवडा कारागृहात ललितच्या संपर्कात म्हणजे अगदी जवळ कोण -कोण होते, त्यांचीही चौकशी करणे गरजेचे बनले आहे. इतकंच नाही तर ससूनची संपूर्ण सुरक्षायंत्रणा, तेथील कर्मचारी यांचीही झाडाझडती घेणे आवश्यक आहे.
पुण्यात केवळ १ ऑक्टोबरलाच ड्रग्ज आले असे नाही, यापूर्वीही नक्कीच आले असणार. ते कोणाला देत होते, याचाही उलगडा होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुरवठादार कोण होते, विकत घेणारे कोण, याचाही तपास बाकी आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी विश्रांतवाडी येथे सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणात कुरिअर व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे; पण ससून प्रकरणात कोणत्याच कुरिअर कंपनीकडे चौकशी करण्यात आली नसल्याचे समजते. तसे पाहिले तर शहरात मोठ्या प्रमाणात कुरिअर कंपन्या आहेत. पण एकाही कुरिअर कंपनी अथवा व्यावसायिक संशयित म्हणून या प्रकरणात आढळला नाही, हे आश्चर्यचकित करायला लावणारे आहे. त्यामुळे तपास काेणत्या दिशेने गेला की जायला भाग पाडला, अशी चर्चा आता सुरू आहे.
ससूनचे-पिमपरी चिंचवड कनेक्शन
ससून रुग्णालय परिसरात १ ऑक्टाेबर २०२३ मध्ये कारवाई करून सुमारे दोन कोटी १५ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या त्या दरम्यानच पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख परिसरात दोन कोटी २० लाखांचे ड्रग्ज पकडले गेले. यात नमामि शंकर झा याला अटक केले. ललित पाटील प्रकरणात पैसे घेण्यासाठी जर्मन नावाचा व्यक्ती हा चाकण येथे येऊन थांबला होता म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे हे पिंपरी चिंचवड परिसरातून जात असल्याचे समोर आले; पण पोलिसांनी नमामि झाकडे ससून प्रकरणाची चौकशी केली नसल्याचे समजते. विशेष म्हणजे सुभाष मंडल हादेखील देहूरोड येथे वास्तव्यास होता. त्यामुळे देहूरोड कनेक्शनचीही आता चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. इकडे सर्व काही घडत असताना महामार्गावर एक पोते मिळून आले होते. ते कोठून आले, याचे रहस्य अजूनही उलगडले नाही. इतकंच नाही तर देहूराेड या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.