पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेऊन अॅस्ट्राेस्टॅटिस्टिक्स याविषयी नवीन वैकल्पिक अभ्यासक्रम संख्याशास्त्र विभागात सुरु केला अाहे. खगाेलशास्त्र, खगाेलभाैतिकशास्त्र अाणि माेठ्या प्रमाणावर गाेळा हाेणाऱ्या संख्यात्मक माहितीचे संगणकाच्या सहाय्याने विश्लेषण करण्यासाठी विद्यापीठ विद्यार्थ्यांकरिता या अभ्यासक्रमाची सुरुवात केली अाहे. असा अभ्यासक्रम असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशात दुसरे विद्यापीठ ठरले अाहे, अशी माहिती संख्याशास्त्र विभागप्रमुख डाॅ. टी. व्ही रामनाथन यांनी दिली. या अाधी काेलकाता विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरु अाहे.
या अभ्यासक्रमासाठी संख्याशास्त्र विभागाला विद्यापीठातील सेंटर फाॅर माॅडेलिंग अाणि सिम्युलेशन तसेच इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्राॅनाॅमी अॅन्ड अॅस्ट्राेफिजिक्स तसेच नॅशनल सेंटर फाॅर रेडिअाे अॅस्ट्राेफिजिक्स या संस्थांचे विशेष सहकार्य असणार अाहे. अलीकडे अाढळलेल्या गुरुत्वीय लहरी, खगाेलशास्त्र, खगाेलभाैतिकशास्त्र संदर्भातील नवीन घडामाेडी यांविषयी शास्त्रज्ञ व संशाेधकांना सातत्याने वेगळी माहिती मिळत अाहे. इस्राेच्या चांद्रयान अाणि मार्स अार्बिटर मिशन या मंगळ माेहिमेविषयी भारतात अाकर्षण निर्माण झाले अाहे. या माेहिमांमधून सातत्याने नवीन माहिती उपलब्ध हाेत अाहे. विश्वातील अगणित रहस्यांविषयी हाती येत असलेली निरीक्षणे पाहता त्या माहिती व निरीक्षणांचा संख्याशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करुन वेगळ्या पद्धतीने या माहितीचे विश्लेषण करता येईल, या विचाराने हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करण्यात अाला अाहे. विद्यापीठातील संख्याशास्त्र, सेंटर फाॅर माॅडेलिंग अाणि सिम्युलेशन अाणि गणितशास्त्र विभागातील एकूण 40 विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला अाहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर खगाेलशास्त्र व खगाेलभाैतिकशास्त्र या विषयांसंदर्भात अातापर्यंत उपलब्ध माहितीवर विश्लेषणात्मक काम करण्याची संधी भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध हाेणार अाहे.