पुणे : ‘महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाच्या भारतीय वैद्यकशास्त्र (आयुर्वेद) शाखेच्या पदवी बीएएमएस व पदव्युत्तर पदवी (एमएस प्रसूतिशास्त्र, स्त्रीराेग) अभ्यासक्रमात चक्क या विद्यार्थ्यांना ‘पुत्रकामेष्टी यज्ञ, इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी’ हे शिकवले जात असून, त्यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र या कायद्याचा भंग हाेत आहे. हे संविधानाच्याविरुद्ध आहे. त्यामुळे हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा,’ अशी मागणी थेट अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आराेग्यमंत्र्यांना आठ ऑगस्ट राेजी एका पत्राद्वारे केली आहे.
याबाबत अहमदनगरच्या संगमनेर येथील माहिती अधिकार कार्यकर्ता गणेश बाेऱ्हाडे यांनी याबाबत तक्रार केली आहे. मंत्री भुजबळ यांनी आराेग्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, आयुर्वेद डाॅक्टरांना ‘बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसीन सर्जरी’ (बीएएमएस) ही पदवी व ‘स्त्रीराेग व प्रसूतिशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी’ (एमएस प्रसूतिशास्त्र स्त्रीराेग) या अभ्यासक्रमात चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग संग्रह हे ग्रंथ शिकवले जातात. यामध्ये मनाप्रमाणे संतती तसेच शुद्रांसाठी इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी, याबाबतचे शिक्षण दिले जाते.
यामधून या वैद्यकीय विद्यार्थ्यांना पुत्रप्राप्ती कशी करावी किंवा करून द्यावी, हे शिकवले जात असल्याने गर्भधारणा व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध, पीसीपीएनडीटी) या कायद्याचा भंग हाेत आहे. प्रसूतीपूर्व कालावधीत लिंग निदान करणे, सांगणे, प्राेत्साहन देणे इत्यादीमुळे ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा भंग हाेत आहे. साेबतच तसेच यामध्ये जात व वर्ण व्यवस्था शिकवणारी माहितीही आहे, असेही पत्रात म्हटले आहे. आता यावर आराेग्य विज्ञान विद्यापीठ काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
याआधीही वादग्रस्त भाग वगळण्याची झाली हाेती मागणी
अभ्यासक्रमातून हा वादग्रस्त भाग वगळला जावा, अशी मागणी पुण्यातील राज्य कुटुंब कल्याण कार्यालयानेही आराेग्य विज्ञान विद्यापीठाकडे नाेव्हेंबर २०१६ ला एका पत्राद्वारे केली हाेती. मात्र अद्यापही विद्यापीठाने याबाबत काेणतीही कार्यवाही केली नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
काय म्हटले आहे ग्रंथात?
या ग्रंथातील चरक संहितेत ‘शरीर संख्या शरीराध्याय:, जातीसूत्रीय शरीराध्याय:, गर्भाधान, गर्भ आणि गर्भिनी परिचर्या सूत्रस्थान आदी वेगवेगळ्या प्रकारातून पुसंवन विधी, पुत्रकामेष्टी यज्ञ, पुत्रेष्टीयज्ञाचे पूर्वकर्म, मनाेवांछित संतती तसेच शुद्रासाठी इच्छित पुत्रप्राप्ती कशी करावी याचे शिक्षण दिले जाते, असेही या पत्रात म्हटले आहे.
आता गर्भधारणेसाठी आयव्हीएफसारखे अत्याधुनिक तंत्र आले आहेत. त्यामुळे हे जुने व कालबाह्य धडे अभ्यासक्रमातून काढणे गरजेचे आहे. याउलट या ताेटक्यांचा उपयाेग ग्रामीण भागात भाेंदुगिरीसाठी हाेऊ शकताे. हे धडे पूर्वापार मूळ ग्रंथात आलेले आहेत. त्यावरूनच ‘सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिन’कडून हा अभ्यासक्रम तयार हाेत असताे. मात्र, हा धडा वगळण्याचे अधिकार आराेग्य विभागाला किंवा विद्यापीठाला नाहीत. आयुष मंत्रालयाने जर ‘सेंट्रल काउंसिल’ला अभ्यासक्रमातून हा भाग वगळण्याची विनंती केली तरच ते वगळले जाऊ शकते.
- डाॅ. भीम गायकवाड, ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ, पुणे