पुणे - महात्मा गांधी, क्रांतिज्योती महात्मा फुले आणि इतर अनेक राष्ट्रपुरुष, विचारवंत यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात शुक्रवारी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात फौजदारी दावा दाखल करण्यात आला. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी हा दावा दाखल केला आहे. पुढील सुनावणी येत्या २६ सप्टेंबरला होणार आहे.
२७ जुलै २०२३ रोजी अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी व त्यांच्या परिवारातील स्त्रियांबददल तसेच संपूर्ण महात्मा गांधी वंशावळीबद्दल बदनामी करणारे वक्तव्य केले, असा आरोप न्यायालयात दाखल केसमध्ये करण्यात आलेला आहे.
तुषार गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, डॉ. मेधा सामंत, अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, संकेत मुनोत, जांबुवंत मनोहर आणि युवराज शाह अशा नऊजणांनी जनतेचे प्रतिनिधी म्हणून ही तक्रार ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. बेनझीर कोठावाला व ॲड. अवंती जायले यांच्यामार्फत कलम १५६ (३) सीआरपीसी नुसार खासगी फौजदारी तक्रार पुण्यातील न्यायालयात दाखल केली आहे.