पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या जप्त करण्यात आलेल्या अलिशान गाड्यांचा लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या 20 पैकी 13 गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. यात बीएमडब्ल्यु, पाेर्शे, टाेयाेटा, एमव्ही ऑहस्टा अशा काेट्यावधी रुपयांच्या गाड्यांचा समावेश आहे.
गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी डीएसके यांना अटक करण्यात आली. सध्या डीएसके हे न्यायालयीन काेठडीत आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांची फसवणुक केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेले अनेक गैरव्यवहार पुढे आले हाेते. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रारंभी डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यावर प्राधान्य दिले होते. त्यानंतर पोलिसांनी डीएसकेंची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे महागड्या व अलिशान गाड्या असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी फेब्रुवारी व मार्च 2018 मध्ये त्यांच्याकडील 20 अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या.
पांढऱ्या शुभ्र रंगाच्या दोन "बीएमडब्ल्यू', एक लाल "पोर्शे', दोन टोयाटा, या चारचाकी गाड्यांसह एमव्ही ऑगस्टा ही दुचाकी अशा पाच कोटींच्या गाड्या प्रारंभी जप्त केल्या. त्यानंतर दोन इनोव्हा, एक इटीऑस, एक कराेला अल्टीस व एक क्वालीस अशा 20 गाड्या पोलिसांनी जप्त करुन शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. डीएसकेंच्या काही आलिशान गाड्यांना 1001 हा क्रमांक आहे. या क्रमांकास व जगातील आलिशान गाड्यांना डीएसके कुटुंबीयांकडून अधिक पसंती दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून या गाड्या पडून आहेत. त्या खराब हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गाड्यांचा लिलाव करु देण्याची मागणी पाेलिसांकडून न्यायालयास करण्यात आली हाेती. त्यानुसार 13 गाड्यांचा लिलाव करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.