पुणे : पदपथावर राहणाऱ्या कचरा वेचकाच्या मुलीवर बलात्कारप्रकरणी खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांवर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. पोलिसांनी तपासच चुकीच्या दिशेने केला व खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचू न शकल्याने न्यायालयाने असमाधान व्यक्त केले आहे.शिवाजीनगर परिसरात फुटपाथवर एक कचरावेचक कुटुंब वास्तव्य करते. पीडित मुलीची आई व इतर कुटुंब रात्री नऊ ते पहाटेपर्यंत कचरा वेचण्याचे काम करतात. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी चार वर्षांच्या पीडित मुलीची आजी कचरा वेचण्यासाठी गेली होती. तसेच पीडित तिच्या आईशेजारी फुटपाथवर झोपली होती. त्या वेळी अनोळखी व्यक्तीने तिला उचलून नदीपात्रातील पाईपमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान, आजी फुटपाथपाशी पोहोचल्यावर मुलगी दिसून न आल्याने तिचा शोध घेतला असता ती त्यांना नदीपात्रात असलेल्या पाईपमध्ये आढळून आली. त्यानंतर तिला लगेच ससून रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. दोन दिवस ही मुलगी बेशुद्धावस्थेत होती. पोलिसांनी याप्रकरणी रणजित विश्वास (वय २३, रा. कोथरूड, पश्चिम बंगाल) याला अटक केली होती. सबळ पुराव्याअभावी विश्वासची न्यायालयाने मुक्तता केली.न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून तपास चुकीच्या दिशेने केल्याचे नमूद करीत पोलिसांवर ताशेरे ओढले. पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट घेताना दिसत नाहीत. या प्रकरणात तपास योग्य दिशेने झाला नसून, तपासात बऱ्याच उणिवा असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
पोलिसांवर न्यायालयाचे ताशेरे
By admin | Published: February 17, 2015 1:16 AM