मोरगाव : न्यायालयाची बैलगाडा शर्यतीला बंदी असतानाही तरडोलीनजीक पवारवाडी (ता. बारामती) येथे आज बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. यासाठी ५ बैलगाडे आले होते. याची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यांनी धाड टाकून काही दुचाकी व बैलगाडे यांवर कारवाई केली.परिसरात अनेक महिन्यांपासून भिर्र...भिर्र... करीत बैलगाडा शर्यत चोरट्या मार्गाने होत असल्याची चर्चा होती. मोरगाव-बारामती रस्त्यावरील पवारवाडी येथे बैलगाडा शर्यती सुरू होण्यास केवळ अर्धा तास बाकी होता. शर्यतीची माहिती समजताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी इतर पोलीस कर्मचा-यांसह घटनास्थळी धाड घातली. पोलीस आल्याची माहिती समजताच शर्यतीचे आयोजक, गाडीवान, पाहणारे प्रेक्षक यांची एकच घाबरगुंडी उडाली.बैल व गाडे सोडून गाडीवान पळून गेले. ज्या टॅम्पोतून या बैलगाड्या आणल्या होत्या, त्यांच्या चाकातील हवा पोलिसांनी सोडून दिली. तर, शर्यत पाहणाºया काही ग्रामस्थ व पे्रक्षकांच्या दुचाकी पोलीस ठाण्यात आणल्या होत्या. आयोजकांचा दिवसभर शोध सुरू होता.
मोरगाव परिसरात बैलगाडा शर्यत, न्यायालयाचा आदेश डावलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 1:36 AM