पुणे: लग्नाचे आमिषाने लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात केल्याप्रकरणात पीडितेने दि. ५ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यान, या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेविकेचा मुलगा करण दिलीप नवले याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. २८ वर्षीय पीडितेच्या वतीने ॲड. पुष्कर पाटील व ॲड. आकाश कामठे काम पाहत आहेत. करण आणि पीडितेची ओळख २०२१ मध्ये एका व्यायामशाळेत झाली. यादरम्यान, त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसाने पीडितेने करणला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर त्याने टाळाटाळ केली.
पीडितेला त्याचे इतर मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने तिने विचारणा केल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर, त्याने तिला मारहाण केली. लग्नासाठी थोडा वेळ दे म्हणत वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्यातून पीडिता गर्भवती राहताच तिचा गर्भपात केला. दुसऱ्यांदा पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्यांनी आळंदी येथे लग्न केले. गर्भवती असतानाही त्याने जबरदस्तीने अत्याचार केले. यादरम्यान, आरोपीकडून पुन्हा गर्भपात करण्याचा प्रयत्न होताच पीडितेने आजी आजारी असल्याचे कारण देत गावी धाव घेतली. त्यानंतर, पुण्यात येत आरोपीविरोधात तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. बचाव पक्षातर्फे काम पाहणारे ॲड. विजयसिंह ठोंबरे म्हणाले की, पीडिता व आरोपी यांचा १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आळंदी येथे हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले असून, ती गरोदर आहे. फक्त कौटुंबिक वादातून व नाहक बदनामी करण्याच्या उद्देशाने विवाहानंतरही लैंगिक अत्याचारासारखा खोटा आरोप पीडितेने केला आहे. तक्रारीची कोणतीही शहानिशा न करता आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ॲड. ठोंबरे यांनी नमूद केले.