लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सततच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीला स्वतंत्र राहाण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने पतीची मागणी मान्य करीत, पत्नीला स्वतंत्र राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पत्नीला वेगळे घर द्यावे व त्याचे दरमहा भाडे पतीने भरावे, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राजन आणि रागिणी (दोघांची नावे बदलेली आहेत) यांचा विवाह २०१७ साली झाला. मात्र, घरामध्ये सतत होणारे वाद, सासू-सासऱ्यांबरोबर सतत उडणारे खटके, यामुळे रागिणीने २०१९ साली कौटुंबिक हिंसाचाराबाबत पती, सासू-सासऱ्यांविरोधात खटला दाखल केला. यावेळी अंतरिम पोटगी म्हणून दरमहा ५० हजार रुपये देण्यात यावे, तसेच कायमस्वरूपी म्हणून १ कोटी रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत पत्नीला दरमहा ४ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. या कारणावरून तिने सासू-सासऱ्यांशी वाद घालून त्यांच्या विरुद्ध कलम ४९८ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पतीने त्यामुळे अॅड.पुष्कर पाटील, अॅड.रेश्मा सोनार यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज करत पत्नीला वेगळे राहण्याचा आदेश करावा, अशी मागणी केली. दरम्यान, पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. पती-पत्नी व सासू-सासरे यांच्यामध्ये होणाऱ्या सततच्या वादामुळे आणि भविष्याच अजून अडचणी वाढू नयेत, म्हणून न्यायालयाने पतीचा अर्ज मंजूर करत पत्नीला स्वतंत्र राहण्याचे आदेश दिला आहे.