लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: गेल्या नऊ महिन्यांपासून महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांपुरते मर्यादित असलेले जिल्हा न्यायालयातील कामकाज सोमवारपासून (दि.11) पूर्णवेळ सुरू होणार असून, उच्च न्यायालयाच्या सुधारित मानक कार्यप्रणालीनुसार सकाळी 11 ते दुपारी 1.30 आणि 2 ते 4.30 या दोन शिफ्टमध्ये कामकाज चालणार आहे.
शनिवारी (दि. ९) महानगरपालिका व बार असोसिएशनतर्फे सर्व बाररूम्स, लायब्ररी, टेबल स्पेस व चेंबर्समध्ये निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यात आली.
उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली होती. त्यात झालेल्या चर्चेत नियमित कामकाजाबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मकता दर्शवली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार न्यायालये लवकरच पूर्णपणे खुली होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. नियमित कामकाजास परवानगी मिळाल्याने प्रलंबित खटल्यांवर सुनावणी घेत ते निकाली लागण्यास मदत होणार आहे.
......
कामकाजाच्या अटी :
- सर्व न्यायाधीश व कर्मचारी प्रत्येक शिफ्टमध्ये हजर असतील
- पहिल्या शिफ्टमध्ये पुराव्यासाठी लावलेल्या दाव्यांना प्राधान्य
- दुसऱ्या शिफ्टमध्ये युक्तिवाद ऐकणे, निकाल तसेच आदेश पारित होतील
- वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी हजर नसतील तर विरुद्ध होणार नाहीत
- हजर होणे बंधनकारक केलेल्यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रवेश
- न्यायालयाने पुकारा केल्याशिवाय कोर्ट हॉलमध्ये प्रवेश नाही
- कामकाज संपल्यानंतर संबंधितांनी कोर्ट हॉलमधून व न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडावे
...