पुणे : पुण्यात श्वानांचा अनधिकृत सांभाळ करताना तसेच त्यांचे ब्रिडिंग (प्रजनन) करताना त्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याचा प्रकरणात प्राणी प्रेमी मनेका गांधी यांच्या पिपल फॉर ॲनिमल्सने पोलिसांमार्फत कारवाई करुन १२ श्वान ताब्यात घेतले होते. या श्वानांना मुळ मालकाच्या ताब्यात देण्यास न्यायालयाने नकार देत त्यांचा ताबा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
पिपल फॉर अॅनिमल्सच्या पुणे जिल्हा अध्यक्षा पुनीत खन्ना व विनिता टंडन यांनी पोलिसांच्या मदतीने १२ श्वानांची लोणीकंंद परिसरातून सुटका केली होती. श्वानांची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा त्यांच्या त्वचेला इजा झाल्याचे दिसून आले. त्यांचा क्रूरतेने सांभाळ केला जात असल्याचे दिसून आले.
श्वानांच्या मालकाने श्वानाचा ताबा मिळावा, असा अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयात 'पिपल फॉर अॅनिमल्स' यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे, ॲड. अशितोष शेळके यांनी बाजू मांडली आहे. न्यायालयाने मूळ मालकाला श्वानांचा ताबा देण्यास नकार दिला. तर, संबंधित व्यक्तीला या श्वानाचा सांभाळ व वाहतूक खर्च प्रति दिन २६० रुपये प्रमाणे एक वर्षाचा खर्च द्यावा, असे आदेश दिले आहेत. तसेच, हा खर्च व श्वान पुढील ७ दिवसात जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती यांच्याकडे देण्याचा ताबा द्यावे असे म्हटले आहे.
श्वानांचे ब्रिडिंग (प्रजनन) करण्यासाठी शासनांची परवानगी लागते. तसा परवाना मिळतो. मात्र या व्यक्तीकडे परवाना नाही. तर सांभाळ करण्यासाठी देखील परवानगी लागते. ती देखील नाही.
............फक्त ५ जणांकडे प्रजननाची परवानगी
कुत्री, मांजरी पाळण्याचे प्रमाण दिवसेंदिवसे वाढत चालले आहे. त्यासाठी परदेशी जातीच्या कुत्र्यांना अधिक मागणी आहे. त्यामुळे त्यांचे प्रजनन करणार्यांची संख्या वाढली आहे. प्राण्यांचे प्रजनन करायचे असेल तर त्यासाठी परवानगी आवश्यक असते. सध्या शहरात अशा प्रकारे कोणतीही परवानगी न घेता प्रजनन करणारे शंभरावर व्यक्ती, संस्था आहेत. त्यापैकी केवळ ५ संस्थांनी रितसर परवानगी घेतली आहे, असे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.