पुणे, दि. 12 - पुण्यात एका दिव्यांग मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या दिव्यांग मुलीला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाचा जामीन विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी फेटाळला. अशोक गंगाराम शेलार (वय ३५, रा. ताडीवाला रस्ता) असं जामीन फेटाळलेल्या आरोपीचं नाव आहे.
या प्रकरणी २४ वर्षीय पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना १७ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास शेलार याच्या ताडीवाला रस्ता परिसरातील घरामध्ये घडली. पीडित मुलगी जन्मापासून दिव्यांग आहे. शेलार याने तिला घरात बोलावून बलात्कार केल्याचं तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेलार याला अटक केली आहे. शेलार सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. या प्रकरणात अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. जामीन मिळाल्यास आरोपी पुराव्यामध्ये छेडछाड करण्याची आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळून नये, असा युक्तीवाद अॅड. सप्रे यांनी केला होता.