लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराचा पॉझिटिव्ह रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर सोमवारपासून शहर अनलॉक झाले. आता त्याच धर्तीवर शहरातील न्यायालयेही मंगळवारपासून अनलॉक होत आहेत. शहरातील सर्व प्रकारच्या न्यायालयांचे कामकाज मंगळवार १५ जूनपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचवेळी पिंपरी-चिंचवडमधील न्यायालये पूर्ण वेळ सुरू करण्यात मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पिंपरीतील न्यायालये पूर्वीप्रमाणे एकाच शिफ्टमध्ये सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत सुरू राहणार आहेत.
कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून न्यायालयात केवळ तत्काळ व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू होती़ त्यामुळे इतर दाव्यांना पुढील तारखा दिल्या जात होत्या. आता पुणे शहरातील सर्व प्रकारची न्यायालये पूर्ण वेळ सकाळी ११ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे प्रलंबित आणि नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या दाव्यांवर सुनावणी होणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. त्यानुसार आता पुणे महापालिका हद्दीतील न्यायालयांना पूर्ण वेळ कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कामकाजाची वेळ कशी असेल, याबाबतचे परिपत्रक प्रमुख जिल्हा न्यायाधीश नीरज धोटे यांनी काढले आहे.
न्यायालये पूर्ण दिवस सुरू राहणार असली तरी कॅन्टीन मात्र बंद राहणार आहे. तसेच सर्व बार रुम्स ५० टक्के आसन क्षमतेने उघडे ठेवण्यात येणार आहे. तर बार रुम्स व टेबल स्पेसच्या ठिकाणी पक्षकारांना बोलाविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
....
प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्यासमवेत बैठक झाली आहे. उच्च न्यायालयाने प्रत्येक ठिकाणच्या परिस्थितीनुसार न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे जिल्हा न्यायाधीशांना कळविले आहे. त्यानुसार पुणे शहरातील न्यायालये मंगळवारपासून पूर्ण दिवस व पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.
- सतीश मुळीक, अध्यक्ष पुणे बार असोसिएशन