उदापूर : मुंबई येथे राहत असणारे कुटुंब रिक्षातून आपल्या मूळ गावी नगर जिल्ह्यातील संगमनेर हद्दीतील चंदनापुरीला येत होते. माळशेज घाटात आल्यानंतर रिक्षावर दरड कोसळली यात मुलगा व नातू आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मरण पावले, तर दैव बलवत्तर म्हणून आई-वडील आणि थोरला मुलगा यातून बालंबाल बचावला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६:३० मि. दरम्यान माळशेज घाटातील गणेश मंदिराजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथील भालेराव कुटुंब आपल्या रिक्षा (क्र एम.एच. ०३ डी. एस. ३२११) मधून चंदनापुरी येथे मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. माळशेज घाटातून प्रवास करत असताना रिक्षावर दरड कोसळली. यात पुतण्या सोयंम भालेराव वय (६), चुलता राहुल भालेराव वय (३७) हे दोघे जण जागीच ठार झाले, तर बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (५८), वडील बबन भालेराव वय (६२) व भाऊ सचिन भालेराव (४०, सर्व रा. घाटीपाडा नं. २ वाळकाबाई चाळ बिहार रोड योगीहील, मुलुंड, प. मुंबई ) हे थोडक्यात बचावले. या अपघातामध्येमृत्यू झालेल्या व्यक्तींना सरकारी दवाखाना ओतूर येथे आणले असून ओतूर पोलिसदेखील घटनास्थळी दाखल झाले.