पुणे : औंध जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. १६) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले. लस देण्याआधी संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र लिहून घेण्यात आले. पुणे जिल्ह्यात आणि शहरातील सर्व केंद्रांवर सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्डचे लसीकरण करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात औंध जिल्हा रुग्णालयाला १०० व्हायल आल्या आहेत. याचा अर्थ २ हजार डोस दिले जाणार आहेत. कोव्हिशिल्डप्रमाणेच कोव्हॅक्सिनचेही दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. दोन्ही लसींच्या डोसचे प्रमाण ०.५ मिली इतकेच आहे.
औैंध जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर म्हणाले, “पुणे जिल्ह्यात केवळ औंध जिल्हा रुग्णालयातच कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. कोव्हॅक्सिनचेही दोन डोस देण्यात येणार आहेत. प्रत्येक दिवशी शंभर लोकांना लसीकरण अशा प्रकारे आठवड्यातून चार दिवस लसीकरणाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे दररोजचे वेळापत्रक सांभाळून लसीकरण सुरु राहील.”
कोव्हॅक्सिन लसीच्या चाचण्या अद्याप सुरु आहेत. या लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लस देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या सुचनांनुसार संबंधितांकडून संमतीपत्रे लिहून घेण्यात आली आहेत.
चौकट
जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण
-पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आठ केंद्रावर प्रत्येकी शंभर या प्रमाणे ८०० मंडळींचे लसीकरण केले जाणार होते. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये ४५६ म्हणजेच ५७ टक्के लोकांनी लसीकरण करुन घेतले तर ३४४ जणांनी त्याकडे पाठ फिरवली. -जिल्ह्यात पंधरा केंद्रांवर पंधराशे लोकांचे लसीकरण होणार होते. त्यापैकी ९०८ लोकांनी म्हणजेच ६१ टक्के लोकांनी लस टोचून घेतली.
-जिल्ह्यात सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल या एकमेव केंद्रावर शंभर टक्के लसीकरण झाले. जिल्ह्यातील सर्वात कमी लसीकरणाची नोंद कमला नेहरु रुग्णालयात ३४ टक्के इतकी झाली.
चौकट
रुग्णालयात नकार
पहिल्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हा या तिन्ही ठिकाणी मिळून ३ हजार १०० जणांचे लसीकरण होणार होते. यातल्या जवळपास निम्म्या जणांनी लसीकरणाला थेट दांडीच मारली. तर ७१ जणांनी रुग्णालयात आल्यानंतर लस घेण्यास नापसंती दर्शवली. लसीकरण नाकारणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातील १५, पुण्यातील ३२ आणि पिंपरी-चिंचवडमधील २४ जणांचा समावेश आहे.