पुणे शहरातील सर्व लसीकरण केंद्र आज बंद राहणार आहेत. काही केंद्रावर जिथे कोव्हॅक्सिनचा साठा आहे ती केंद्र वगळता इतर कोणत्याही केंद्रावर लसीकरण होणार नाहीये.
पुणे शहरासाठी काही दिवसांपूर्वी कोव्हीशिल्डच्या ३५००० लसी आल्या होत्या. मात्र या लसी संपल्या तरी राज्याकडुन नवीन साठा आलेला नाहीये. यामुळे ही केंद्र बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
आज संपुर्ण दिवस लसीकरण बंद राहणार असुन आजही राज्य सरकारकडुन नवीन साठा येण्याबाबत काहीही माहिती पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे साठा आला तरच उद्या लसीकरण सुरु होवु शकेल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान कोव्हीशिल्ड संपलेलं असले तरी काही केंद्रावर कोव्हॅक्सिनचा साठा उपलब्ध आहे. ती केंद्र सुरु रहातील असेही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेले काही दिवस सातत्याने लसीच्या पुरवठ्याचा प्रश्न महापालिकेला भेडसावतो आहे. लसींच्या अभावी केंद्र बंद राहिल्याने नागरिकांना अपॅाईंटमेंट घेवुनही मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यातच आता साठा संपल्याने केंद्र बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम नेमकी नीट सुरु होणार तरी कधी असा प्रश्न विचारला जातो आहे.