पुणे : त्याचे वय अवघे २५ वर्षे...वीज वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कोल्हापूरमधील देवळे गावच्या तरुणाचा रस्त्यावर गंभीर अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांची शर्थ करूनही त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि तरुणाला मेंदूमृत घोषित केले. आपल्यावर कोसळलेल्या संकटातून सावरत आई-वडील आणि नातेवाइकांनी तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. तरुणाच्या दोन किडनी, हृदय, यकृत आणि डोळे दान केल्याने इतर रुग्णांना जीवदान मिळाले.
नातेवाइकांनी ‘अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान’ ही उक्ती प्रत्यक्षात उतरवत तरुणाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. कोल्हापूर आणि पुण्यातील डॉक्टरांची तत्परता, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथील प्रशासकीय अधिकारी, वाहतूक पोलीस यांच्या वेगवान हालचालींमुळे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि अवघ्या अडीच तासांमध्ये २७० किलोमीटरचे अंतर पार करत किडनी आणि हृदय पुण्यात आणून प्रत्यारोपण करण्यात आले. या वर्षातील पुणे विभागातील हे पहिले हृदय प्रत्यारोपण असल्याचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे सांगण्यात आले.
सह्याद्री हॉस्पिटल्समधील हृदय प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. मनोज दुराईराज म्हणाले, ‘‘हृदयाच्या आजाराच्या अंतिम टप्प्याने ग्रस्त असलेल्या व हृदय फक्त २० टक्के कार्यक्षमतेने सुरू असलेल्या एका ५९ वर्षीय रुग्णावर हे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.’’
हृदय प्रत्यारोपण टीममध्ये डॉ. दुराईराज यांच्यासह डॉ. राजेश कौशिश व डॉ. सुमित अगस्थी, प्रत्यारोपण भूलतज्ज्ञ डॉ. शंतनू शास्त्री, डॉ. सुहास सोनावणे व डॉ. प्रीती अडाते, परफ्युशनिस्ट प्रशांत धुमाळ, अमर जाधव, सम्राट बागल, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. स्वाती निकम, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला पाध्ये आणि ऑपरेशन थिएटरमधील सहकारी मुकेश अडेली, सुमन भरत आणि किरण यांचा समावेश होता.