पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्याचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे खासगी वाहतूक थांबली होती. सर्व हॉटेल, बार बंद होते. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दारूविक्रीची दुकाने सुरु झाली. परंतु, बार बंद होते. त्याचबरोबर ब्रेथ ॲनालायझरच्या वापराने कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने त्याचा वापर बंद करण्यात आला. कोराेनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे न संपल्याने ब्रेथ ॲनालायझरचा वापर सुरु करण्यात आलेला नाही.
एका बाजूला हाॅटेल, बार, परमिट रुम बंद असल्याने अनेक महिने लोकांना बाहेर दारू पिण्याची सोय नव्हती. त्यामुळे हॉटेल, बारमध्ये दारु पिऊन गाडी चालवत घरी अथवा अन्यत्र जाण्याचा प्रसंग बहुतांशी लोकांवर आला नाही.
३१ डिसेंबर रोजी दारु पिऊन नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आपल्याकडे रुजू लागली आहे. मात्र, कोविड १९ मुळे यंदा हाॅटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आल्याने लोकांनी घरीच थांबून नववर्षाचे स्वागत केले.
३१ डिसेंबर रोजी वाहतूक शाखेने प्रत्येक विभागाला काही ब्रेथ ॲनालायझर दिले होते. त्याबाबत सर्व खबरदारी घेऊन त्या रात्री तपासणी करण्यात आली. त्यात २६१ जणांवर कारवाई केली गेली होती.
ब्रेथ ॲनालायझरचा वापर केला जात नसला तरी पोलिसांना एखादा वाहनचालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याचे जाणविल्यास स्थानिक पोलीस ठाण्याच्या मदतीने अशा वाहनचालकाची ससून रुग्णालयात नेऊन चाचणी केली जाते व त्यात तो दोषी आढळल्यास कारवाई केली जात असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले.
.........
कोराेनाचा प्रसार होऊ नये, म्हणून ब्रेथ ॲनालायझरचा वापर थांबविण्यात आला आहे. अजूनही कोरोना पूर्णपणे रोखला गेला नसल्याने त्याचा वापर सुरु करण्यात आला नाही. ३१ डिसेंबर रोजी काही प्रमाणावर ब्रेथ ॲनालायझरचा वापर करुन ड्रंक ॲन्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली होती.
- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.