पुणे : हिंजवडी येथील आयटी कंपनीत शासनाचा आरोग्य विभाग, पुणे जिल्हा परिषद आणि विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ४५० खाटांचे अद्ययावत अशा 'कोविड केअर' रुग्णालयाचे गुरुवारी (दि.११) हस्तांतरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
हिंजवडी येथे आयटीकंपनीच्या पुढाकारातून उभे करण्यात आलेले प्रशस्त 'कोविड केअर' रूग्णालय हे राज्यातील पहिले स्वतंत्र अद्ययावत असे रुग्णालय असणार आहे. कोरोना महामारीचा देशात शिरकाव झाल्यानंतर विषाणूंचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी सर्व स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या. युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करतानाच, अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र कोविड रुग्णालय उभी करण्यात आली. राज्यात उपलब्ध असलेल्या रुग्णालयात स्वतंत्र कोरोना विभाग सुरू करण्यात आला.
कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव आणि स्वतंत्र रूग्णालयाची गरज लक्षात घेऊन हिंजवडी आयटीपार्क मध्ये विप्रो कंपनीच्या विशेष सहकार्याने चारशे पन्नास खाटांचे अद्ययावत कोविड केअर रुग्णालय उभारण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाबाधितांवर याठिकाणी उपचार करण्यात येणार आहे, तसेच तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलविण्यापुर्वी रुग्णांची प्रकृती स्थिर करण्यासाठी विशेष अशा बारा खाटांची याठिकाणी सोय करण्यात आली आहे. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष संकुलात चोवीस खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हिंजवडी फेज एक मध्ये विप्रो कंपनीच्या आवारातच हे भव्य कोविड रुग्णालय उभे राहिल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची तपासणी करून तत्काळ उपचार करण्यास मदत होणार आहे.