सहकारनगर -
आंबिल ओढा, दांडेकर पूल येथील राहणारे कुटुंब हे हातावरचे पोट असणारे असून, मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दाट लोकवस्ती असलेला हा भाग असून आज कोरोनाचे संकट आहे. अशातच कोरोनाची लागण येथील नागरिकाला झाली, तर बेडसाठी वणवण करत फिरावे लागते.
पुणे महापालिकेच्या दवाखान्यात देखील बेड मिळत नाही. खासगी रुग्णालयात जर बेड मिळाला तर खिशात पैसे नसतात. खासगी रुग्णालय आधी डिपाॅझिट भरायला सांगतात. पैसे नसल्यामुळे उपचार न घेता घरी यावे लागते, अशातच काहींना जीवदेखील गमवावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे म्हणाले,
स्थानिक नगरसेवकांशी संपर्क केला तर फोनदेखील उचलत नाहीत. या भागातील स्थानिक नगरसेवक धीरज घाटे हे पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी गेले असून, नागरिकांकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या वर्षी साने गुरुजी या शाळेत क्वारंटाइन सेंटर चालू केले होते. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा चालू करून आॅक्सिजन बेडची सोय करण्यात यावी.’’
दरम्यान, नगरसेवक धीरज घाटे यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. तसेच भ्रमणध्वनीवरून संदेश पाठवूनही याबाबत कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही.