गेल्या काही दिवसांपासून दौड तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. उपचारासाठी असलेले हॉस्पिटल्समधील बेड अपुरे पडत आहेत. उपचाराअभावी अनेक रुग्णाची अवस्था गंभीर होत आहे. ग्रामीण भागातदेखील रुग्णांना बेड मिळविण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पिंपळगाव ग्रामपंचायतीने आपल्या गावातील रुग्णांसाठी स्वखर्चाने कोविड सेंटर उभारुन कठीण काळात आदर्श निर्माण केला आहे.
दौंड तालुक्यातील राहु व देलवडी ग्रामपंचायतीने आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनातून गावातील विद्यालयातील वर्ग खोल्यात प्रत्येकी ५० बेडचे कोविड सेंटर सुरु केले आहे. याच धर्तीवर पिंपळगाव येथील तरुण कार्यकर्ते एकत्र येत स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने कोविड सेंटरची उभारणी केली आहे. गावात सध्या पन्नासपेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला असून मंगळवारी तीन जणांचा बळीही गेला. गावा-गावात जर अशी उपचार केंद्र सुरु करता आली तर आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सरपंच मंगल नानासाहेब थोरात, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष विश्वासे यांनी सांगितले.