पुणे : कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर काेव्हॅक्सिन या काेराेना प्रतिबंधात्मक लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायाेटेक या कंपनीने आता नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक ही काेराेना प्रतिबंधात्मक लस विकसित केली आहे. १८ वर्षे व त्यापुढील वयाेगटातील नागरिकांना दिली जाणारी ही लस जानेवारीअखेरीस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. खासगी रुग्णालयांना ८०० रुपयांना आणि शासकीय संस्थांना ३२५ रुपयांना ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.
राज्याचे आराेग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांनी याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांचे आराेग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व इतर अधिकाऱ्यांना जारी केले आहे. या लसीचे दाेन डाेस घ्यावे लागतील, तर तिसरा बूस्टर डाेसदेखील घेता येईल. तसेच एखाद्याने आधी काेविशिल्ड किंवा काेव्हॅक्सिन लसीचे दाेन डाेस घेतले असतील तर त्याला ६ महिन्यानंतर इन्कोव्हॅक लसीचा बूस्टर डोसदेखील घेता येणार आहे.
इन्कोव्हॅक ही जगातील पहिली इंट्रानेझल म्हणजे नाकातून देण्यात येणारी लस ठरली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला भारत बायोटेकला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून इन्कोव्हॅकच्या बूस्टर डोसच्या वापरासाठी मान्यता मिळाली. सर्व चाचण्यांमध्ये लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे.
लसीची ही आहेत वैशिष्ट्ये :
- १८ वर्षांवरील नागरिकांना या लसीचे दाेन डाेस घ्यावे लागणार, तर बूस्टर डाेसदेखील उपलब्ध
- कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसनंतर सहा महिन्यांनी बूस्टर डोस म्हणून इन्कोव्हॅकचा डोस घेता येणार.
- एक डोस ०.५ एमएलचा असून ८ थेंब (प्रत्येकी चार थेंब) या प्रमाणात डोस नाकावाटे दिला जाणार आहे.
कोरोना लसीकरण कार्यक्रमामध्ये नाकावाटे घ्यायच्या इन्कोव्हॅक लसीचा समावेश करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या लसीकरणाच्या कोविन प्लॅटफॉर्मवर याबाबतचे बदल करण्यात येत आहेत. सध्या तरी ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध हाेईल.
- डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा.