लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात संचारबंदी जारी केल्यापासून शुक्रवारपासून अत्यावश्यक कारणासाठी ई पास देण्याची सुविधा सर्व जिल्हा व पोलीस आयुक्तालयात सुरु केली आहे. हे ई-पास देताना सर्वसाधारण सर्वांकडे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट अत्यावश्यक केले आहे. जर हे सर्टिफिकेट जोडले नसेल तर ई पासची मागणी नाकारण्यात येत आहे. अगदी अत्यंत विशेष कोणाचा मृत्यू झाला असेल व त्यासाठी जायचे असेल तरच अशा व्यक्तींना कोविड सर्टिफिकेट नसले तरी ई-पास दिला जातो. मात्र, ते अपवादात्मक परिस्थितीतच असा पास दिला जात आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारपासून डिजिटल पास सेवा कक्ष सुरु केला आहे. रविवार सायंकाळपर्यंत एकूण ११ हजार २३८ ई पासची मागणी करण्यात आली. त्यापैकी ३ हजार ३०२ पास मंजूर करण्यात आले. ३३८ अर्जाची मुदत संपली होती तर २ हजार ५०० पास प्रलंबित आहेत. आतापर्यंत ५ हजार ९७ अर्ज नाकारण्यात आले आहेत.
---
डिजिटल पाससाठी सर्वांना कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना सर्वांनी ते आवश्यक जोडावे. त्याशिवाय पास मंजूर केला जात नाही.
- श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त
--
* अत्यावश्यक सेवा, सुविधा व वस्तूंमध्ये येत असणाऱ्या नागरिकांना शहरातल्या शहरात प्रवास करताना आपले अधिकृत ओळखपत्र संबंधित नाकाबंदी चेक पाँईटवर दाखवावे. त्यासाठी डिजिटल पासची आवश्यकता नाही.
* जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा गंभीर आजार, लग्न, हॉस्पिटल या कारणाकरिता पुणे जिल्ह्याबाहेर जायचे असल्यास डिजिटल पास देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर करणे अनिवार्य आहे़
लग्न समारंभाकरिता वुध व वर, त्यांचे आईवडिल, भाऊ, बहीण, काका, आत्या, मावशी अशांना ई पास देण्यात येणार आहे. पंरतु, याकरीता लग्न पत्रिका सोबत जोडणे आवश्यक आहे.
* व्यावसायिक कारणांकरीता परवानगी देण्यात येणार नाही.
* विमान प्रवास करणाऱ्यांना प्रवासाकरीता डिजिटल पास देण्यात येईल.
--
एकूण ई पास मागणी अर्ज - ११२३८
मंजूर अर्ज - ३३०२
मुदत संपलेले - ३३८
प्रलंबित - २५००
ना मंजूर - ५०९७