VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सर्वपक्षीयांकडून हरताळ; पुण्यातील लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 09:00 AM2021-02-22T09:00:58+5:302021-02-22T09:08:25+5:30
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आणि प्रशासनाच्या बंधनांना पहिल्याच दिवशी सर्वपक्षीयांकडून हरताळ; धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा
पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे सर्वसामान्यांवर बंधने घातली जात असताना राजकारण्यांना वेगळे नियम आहेत का असा, सवाल आता उपस्थित होतो आहे. कारण पुण्यात पार पडलेल्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियम नियम धाब्यावर बसवले गेल्याचं आता स्पष्ट झालं आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विनामास्क फिरणारी नेतेमंडळी असं चित्र या लग्नात पाहायला मिळालं.
पुण्यातल्या हडपसर येथील लक्ष्मी लॉन्स याठिकाणी धनंजय महाडिक यांचा मुलगा पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी देशमुख यांचा विवाह सोहळा काल पार पडला. या सोहळ्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत, शरद पवार अशा अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. एकीकडे कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करणे टाळा अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशारा दिला असताना थेट राजकारण्यांकडून हे सगळे नियम धाब्यावर बसवले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा; लग्न सोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/e57obC22kE
— Lokmat (@MiLOKMAT) February 22, 2021
या लग्नाला दोनशेहून अधिक लोकांनी तर हजेरी लावलीच पण त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवले गेले. लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेक नेत्यांनी स्टेजवर जातानाही मास्क घातलेला नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगदेखील पाळलं नव्हतं. तर काही लोकांनी मास्क हनुवटीवर घेत फोटोसाठी पोज दिली. याला वधू वरांसोबत धनंजय महाडिकदेखील अपवाद ठरले नाहीत.
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा; सोशल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, हर्षवर्धन पाटील, संजय राऊत, शरद पवार सोहळ्याला उपस्थित https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/4GW2lv7I0D
— Lokmat (@MiLOKMAT) February 22, 2021
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यामध्ये कालपासून नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर लग्नांना दोनशे लोकांची मर्यादा तसेच पोलीस परवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व नियम राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर अशा सोहळ्यांना ही लागू असतील असं खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. नियम पाळले गेले नाहीत तर कारवाई होईल अशी घोषणा झाली आहे. मात्र ही घोषणा झाल्याच्या दिवशीच हा संपूर्ण प्रकार बघायला मिळाल्यामुळे नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. नियमांचे पालन न झाल्याने आता प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का हे पहावे लागेल.