पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, पुणे शहरात ३ जानेवारीपासून (सोमवार) महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात येत आहे. या वयोगटातील मुलांना प्रथमच लस दिली जात असल्याने, ही लस केवळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्येच उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयासह प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील दवाखान्यांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे. या सर्वांना केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली असून, ४० दवाखान्यांमध्ये प्रत्येकी २५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणीव्दारे तर ५० टक्के लस ही लसीकरण केंद्रांवर उपस्थित असलेल्यांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून देण्यात येणार आहे. १४४ ठिकाणी कोव्हिशिल्ड लस
१८ वर्षांपुढील वयोगटाला शहरातील १४४ लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ५ टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे व ५ टक्के लस ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून देण्यात येणार आहे. तर ११ ऑक्टोबरपूर्वी ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांना ४५ टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे व ४५ टक्के लस ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस देण्यात येणार आहे. याचबरोबर १८ वर्षांपुढील नागरिकांना ससूनसह ११ दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांनी ७ डिसेंबर पूर्वी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशांना दुसरा डोसही याठिकाणी उपलब्ध राहणार आहे.