लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊनमध्ये देखील सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या बाजार समितीच्या आवारातील सर्व बाजार घटकांसाठी गुलटेकडी मार्केट यार्डात दि पूना मर्चंट चेंबरच्या सहकार्याने हमाल भवन येथे येत्या तीन दिवसांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. बाजार आवारात कोरोना रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका प्रशासन आणि बाजार घटक संघटनांची बाजार समितीत बैठक पार पडली. या वेळी महापालिकेच्या सहाय्यक आरोग्यप्रमुख आणि लसीकरणप्रमुख पुणे शहर डॉ. वैशाली जाधव, मेडिकल झोनल अधिकारी डॉ. राजेश दिघे, डॉ. अमित उदावंत, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव विजय मुथा, माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेंद्र बाठीया, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, आडते बापू भोसले, कामगार युनिनचे सचिव संतोष नांगरे, संजय साष्टे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरघे आदी उपस्थित होते.