धनकवडी : कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे देशाचा कणा समजला जाणा-या माल आणि प्रवासी वाहतूक व्यवसायाला मोठा फटका बसला असून वाहतूकदारांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. या परिस्थितीतही वाहतूकदार आणि चालक देशाला लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, औषध व मेडिकलचे विविध साहित्य आणि कोरोनाच्या रुग्णांना लागणार्या ऑक्सिजनची वाहतूक करत आहेत. चालक हे कोरोना योद्धे असून लसीकरणासाठी त्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केंद्रीय वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली.
शिंदे म्हणाले की, आमच्याकडील चालक जीवनावश्यक वस्तूंची साखळी अबाधित राहण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. काही चालकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांना तात्काळ विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. देशामध्ये जवळपास दोन कोटी वाहतूकदार चालक आहेत. त्यांच्यासाठी सर्व प्रमुख महामार्गावरील टोल नाके तात्पुरते बंद करून त्या ठिकाणी या सर्व चालकांना लवकरात लवकर कोविड लस मोफत देण्यात यावी. तसेच वाहतूक व्यवसायाशी संबंधित संलग्न व्यवसाय म्हणजे टायर, बॅटरी, गाड्यांच्या स्पेअर पार्टची दुकाने, गॅरेज व जेवणाचे धाबे हे व्यवसाय त्वरित सुरू केले जावेत. कोरोनाच्या कालावधीत वाहनांना करमाफी देण्यात यावी. तसेच इन्शुरन्स, बँक हप्ते आणि वाहनांची कागदपत्रे, परवाने काढणे यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी बाबा शिंदे यांनी नितीन गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
फोटो - बाबा शिंदे.