प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : देशात करण्यात आलेल्या १० हजार ७८७ नमुन्यांचा जनुकीय क्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासल्यानंतर त्यापैकी ७७१ नमुन्यांमध्ये नव्या स्वरुपातील कोरोना विषाणू आढळून आला आहे. या नव्या प्रकारांमध्ये ‘डबल म्युटेशन’ म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. यामुळे विषाणू जास्त काळ रुग्णाच्या शरीरात टिकून राहू शकतो आणि त्याच्या संक्रमणाचाही वेग वाढू शकतो, असे विषाणूतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विषाणूमध्ये ‘ई४८४क्यू’ आणि ‘एल४५२आर’ अशा प्रकारचे म्युटेशन (उत्परिवर्तन) आढळून आले आहे. यामध्ये ‘इम्युन एस्केप’ अशी संज्ञा वापरण्यात आली आहे. याचाच अर्थ विषाणूमधील ‘एस-स्पाईक प्रोटीन’मध्ये बदल होतात आणि ते मानवी शरीरातील पेशींवरील एस-२ (ace 2) ला घट्ट चिकटतात. त्यामुळे शरीरातील प्रतिजैविके (अँटिबॉडी) पूर्ण क्षमतेने विषाणूला प्रतिबंध करू शकत नाहीत. परिणामी, विषाणू शरीरात जास्त काळ टिकतो आणि संक्रमणाचाही वेगही वाढतो. शहरात झपाट्याने वाढणारा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ हा दुहेरी उत्परिवर्तनाचा परिणाम असू शकतो. किमान ५० टक्के नमुन्यांचा जनुकीय क्रम तपासल्यास दुहेरी उत्परिवर्तनाबाबत अधिक ठळकपणे कल्पना येऊ शकेल, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
चौकट
रोगप्रतिकारशक्तीवर करतो मात
“लंडनमध्ये केंट या शहरात झपाट्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत होती. तेथील ५० टक्के नमुन्यांच्या जनुकीय अनुक्रमानंतर कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. नव्या स्ट्रेनमुळे संसर्ग ३०-७० टक्क्यांनी वाढले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत ‘ई४८४क्यू’ हा नवा स्ट्रेन आढळून आला आणि हा स्ट्रेन रोगप्रतिकारकशक्तीवर मात करू शकतो, हे लक्षात आले. सध्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारी असलेली संख्या हा दुहेरी उत्परिवर्तनाचा परिणाम असू शकतो. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात विषाणूच्या उत्परिवर्तनाची क्रिया सुरू होती. उत्परिवर्तनानंतर त्याची क्षमता वाढली. विषाणू आणि मानवाची लढाई सतत सुरू असते. आपण लस, व्हेंटिलेटर अशी हत्यारे निर्माण करतो, त्याप्रमाणे विषाणूही आपली हत्यारे उत्परिवर्तनाच्या स्वरूपात तयार करत असतो. नव्या स्वरुपातील कोरोना विषाणू एकदा लागण होऊन गेलेल्यांनाही पुन्हा संसर्ग करु शकतो किंवा किंवा लस घेतली तरी पुन्हा त्याचा संसर्ग होऊ शकतो. मास्कचा वापर, शारीरिक अंतर आणि लसीकरण ही आयुधे गांभीर्याने वापरली तर संसर्गाची तीव्रता कमी करता येऊ शकते.”
- डॉ. अमित द्रविड, संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ
चौकट
नव्या विषाणूपासूनही लस करेल बचाव
“विषाणूमध्ये दुहेरी उत्परिवर्तन झाले आहे. मात्र, हा बदल कमी नमुन्यांमध्ये आढळून आला आहे. तसेच, राज्यातील संक्रमण दुहेरी उत्परिवर्तनामुळेच झाले यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. कोरोनाचा प्रसार वाढत असला तरी मृत्यूदर कमी आहे. तरुणांना लागण झाली तरी ते लवकर बरे होतात. लसीमुळे नवीन स्वरूपाच्या विषाणूपासूनही बचाव होऊ शकतो. कोरोना झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असेल. येत्या मे महिन्याअखेरपर्यंत वय वर्षे ४५ वरील सर्व व्यक्तींचे लसीकरण झाल्यास कोरोना आटोक्यात येऊ शकतो.”
- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
चौकट
जनुकीय क्रम तपासणी राज्य पातळीवरही व्हावे
एक महिन्यापूर्वी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने २४ नमुन्यांचा जनुकीय क्रम तपासला त्यावेळी ई४८४क्यू हाच व्हेरीयंट आढळून आला. सध्या केवळ केंद्र पातळीवरील संस्थांमध्ये जनुकीय क्रम तपासला जातो. या प्रक्रियेसाठी आवश्यक रिएजंटची किंमत खूप जास्त आहे. सरकारने निधी उपलब्ध करून दिल्यास राज्य सरकारच्या अखत्यारीतील संस्थांमध्ये, ससून सर्वोपचार रुग्णालयामध्येही जनुकीय क्रम तपासता येईल, अशी मागणी पुढे आली आहे.