लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर: कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन हवेली तालुक्यात लोणी काळभोरसह वाघोली नऱ्हे येथील कोविड केअर सेंटर पुन्हा त्वरित पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील खाजगी रुग्णालयांत सर्दी, खोकला, ताप आदी कोविडसदृश रूग्ण रेंगाळत न ठेवता त्यांना तत्काळ नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणीसाठी पाठवून देण्याच्या सूचना सर्व खाजगी रुग्णालयांना दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला शुक्रवारी डॉ. खरात यांनी भेट दिली. तसेच परिसरातील परिस्थितीचे अवलोकन केले. याप्रसंगी पंचायत समिती हवेलीचे माजी उपसभापती युगंधर काळभोर, आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, रूपाली बंगाळे, विस्तार अधिकारी महेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर उपस्थित होते. डॉ. खरात म्हणाले, कदमवाकवस्ती, लोणी रेल्वे स्थानक, वाघोली, कोलवडी, खडकवासला, नऱ्हे व नांदेड ही तालुक्यातील गावे हॉटस्पॉट ठरत आहेत. संभाव्य लाट लक्षात घेऊन कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांत आवश्यक ती सर्व तयारी केलेली आहे. असे असले तरी आठवडे बाजार, लग्न व सार्वजनिक समारंभ आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. मास्क वापरले जात नाहीत ही बाब गंभीर आहे. यापुढे होम क्वारंटाईनचे नियम पाळले नाहीत तर त्यांंचेवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.