शहरात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु लॉकडाऊन हा पर्याय नसून लसीकरणाचा वेग वाढवण्यावर पुणे महानगरपालिका भर देणार आहे. शहरात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड दोन्ही लस उपलब्ध आहेत. कोविशिल्ड की कोव्हॅक्सिन अशा दोन लसीत गोंधळ होणार नाही. नागरिकांचे योग्य लसीकरण ही पालिकेची जबाबदारी असेल. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
देशभरात लसीकरण टप्याटप्याने सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ४५ वयापेक्षा जास्त व्याधीग्रस्त आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींना लस देण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सिरममध्ये तयार होणाऱ्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसीला प्राधान्य देण्यात आले. परंतु कालांतराने यावरून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
महापालिका घेणार जबाबदारी
कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड यावरून काळजी करण्याचे कारण नाही. दोन्ही लसी प्रमाणित आणि भारतातच तयार झालेल्या आहेत. ज्यांनी नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस दिला जाईल ही पालिकेची पर्यायाने आमची जबाबदारी आहे. नागरिकांनी कोणतीही लस घ्यावी. दोन्हीमध्ये फरक नाही. मनात कोणताही संदेह आणू नका. असे मोहोळ यांनी सांगितले आहे.
तसेच कोरोना संसर्गाचा वेग अधिक असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. गृह विलगिकरणामध्ये राहून उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. आवश्यकता वाटल्यास यापूर्वी करार केलेल्या खासगी रुग्णलयांसोबतचे करार पुन्हा वाढविण्यात येतील. रुग्ण संख्या वाढली तर आवश्यकतेनुसार जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा विचार असल्याचे मोहोळ म्हणाले.