पुणे : पुणे महापालिकेला शासनाकडून गुरुवारी कोविशिल्ड लस प्राप्त झाल्यामुळे, आज (शुक्रवार, दि. ३) १८५ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी २३० लसीचे डोस महापालिकेकडून वितरित करण्यात आले आहेत. तर ससूनसह महापालिकेच्या झोननिहाय ११ दवाखान्यांत प्रत्येकी ४०० कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे.
आज लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर १५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर कोविशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१० जूनपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर ३५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. यानंतरही लस शिल्लक राहिल्यास ऑन स्पॉट नोंदणी करून उपस्थित नागरिकांना लस देण्यात यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या असल्याची माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली. लसीकरणाच्या ऑनलाईन बुकिंग करिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.