वाल्हे : ग्रामीण भागात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मग तो वाढदिवस असो कुठला सण असो...वा अन्य कुठला कार्यक्रम .. आणि अशा कार्यक्रमांसाठी प्रत्येक जण हा नेहमीच उत्साही असतो. परंतु अशाच कार्यक्रमांचा आधार घेऊन त्या गावात चक्क देशी गाईचे डोहाळे जेवण घालण्यात आल्याने या जेवणाची जोरदार चर्चा पुरंदर तालुक्यात चांगलीच रंगली .
पुणे जिल्ह्याच्या सीमेवर वीर धरणाच्या पलीकडे असणाऱ्या भादे गावात तानाजी शंकर चव्हाण व त्यांच्या पत्नी अनिता चव्हाण या शेतकरी दांपत्याने एका देशी गाईचा पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. त्यांनी तिचे नाव राधिका असे ठेवले आहे. परंतु या राधिकाच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी कळताच या दांपत्याला आनंद गगनात मावेना झाला. त्यांनी राधिकाला वस्त्र अलंकारात व फुलांच्या हारांनी सजवून महिला ग्रामस्थांच्या मदतीने तीची प्रतीकात्मक ओटी देखील भरली. यावेळी महिलांनी देखील डोहाळे जेवणानिमित्त गाणीही म्हटली. आगळ्यावेगळ्या डोहाळ जेवणाची चर्चा पुरंदर परिसरात रंगली आहे.