पुणे: सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टोळक्याने एका युवकावर कोयत्याने व दगडांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रात्री सव्वा नऊच्या सुमारास वडगाव शेरी येथील मारुती नगरमधील बालाजी पान शॉप येथे घडला.
याप्रकरणी महंमद शमशाद मेहबुब अली (३६, रा. मारुती नगर, वडगवा शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून साहिल सय्यद (१९), मोन्या भालेराव (१९) आणि संतोष पायाळ व त्यांच्यासोबत असलेल्या इतर ४ ते ५ मुलांवर गुन्हा दाखल करुन संतोष पायाळ याला ताब्यात घेतले आहे. आरोपी साहिल सय्यद आणि मोन्या भालेराव हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महंमद अली हे पान शॉपमध्ये असताना आरोपी हातात कोयते घेऊन दुचाकीवरून आरडा ओरडा करत आले. आरोपींनी परिसरात दहशत माजवत अली यांच्याकडे सिगारेट मागितली. मात्र, आरोपींनी यापूर्वी घेतलेल्या सिगारेटचे पैसे दिले नसल्याने अली यांनी आरोपींकडे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपींनी कोयत्याने व दगडाने दुकानाची व सामानाची तोडफोड केली. तसेच गल्ल्यातील १३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. महंमद अली याने विरोध केला असता साहिल सय्यद याने त्याच्याकडे असलेल्या कोयत्याने फिर्यादी यांच्या दंडावर वार करुन गंभीर जखमी केले. महंमद अली यांनी याबाबत चंदननगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत संतोष पायाळ याला ताब्यात घेतले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कुमरे करत आहेत.