प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : लहान मुलांच्या संगोपनासाठी, देखभालीसाठी, पालकांना पाळणाघरांचा मोठा आधार असतो. पण पुण्यात सध्या एक ‘विशेष पाळणाघर’ चर्चेचा विषय बनले आहे...आजी-आजोबांसाठी पाळणाघर! अनुराधा करकरे यांनी ज्येष्ठांच्या आयुष्यात सप्तरंगी इंद्रधनूप्रमाणे रंग भरण्यासाठी ‘रेनबो’ या संस्थेच्या माध्यमातून अनोखी संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.
उतारवयातील एकटेपणा घालविण्यासाठी हे पाळणाघर उत्तम पर्याय ठरले आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत संस्था ज्येष्ठांसाठी खुली असते. या वेळेत नाश्ता, वाचन, प्रार्थना, गप्पा, समुपदेशन, योगा, दुपारचे जेवण, चहापान असा भरगच्च कार्यक्रम असतो. डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, लघुपट पाहणे, वादन, गायन असे उपक्रमही आयोजित केले जातात.