पुणे : कारखान्यावर काम करणाऱ्या कारागिराला दागिने बनविण्यासाठी सोने दिले असताना तब्बल २५ लाख ५५ हजार रुपयांची सोन्याची लगड घेऊन कारागीर फरार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सचिनंदन धरणी पाल (वय ५६, रा. रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पलास बादलजाना (वय २७, रा. गोपीनाथपूर, पूर्व मिदनापूर, प. बंगाल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाल यांचे रविवार पेठेतील पालगोल्ड स्मिथ या नावाने सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. त्यांच्याकडे पालस बादलजाना हा कारागीर गेल्या दीड वर्षापासून कामाला होता. तो त्यांच्याकडेच राहात होता. पाल यांच्याकडे शहरातील एका नामांकित सराफ पेढीतून दागिने बनविण्याचा ऑर्डर आली होती.
गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी त्यांना २५ लाख ५५ हजार ६२६ रुपये किमतीची ५७८ ग्रॅम सोन्याच्या लगडी दागिने बनविण्यासाठी दिल्या होत्या. त्याचे त्याने काही दागिने अर्धवट बनविले होते. त्यानंतर तो हे अर्धवट बनविलेले दागिने व सोन्याच्या लगडी घेऊन पळून गेला. काही दिवस वाट पाहिल्यानंतर आता पाल यांनी फिर्याद दिली असून फरासखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील तपास करीत आहेत.