लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो छोट्या सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने पकडले.
शब्बीरउद्दीन बडेसाब अलालखान (वय ३८, रा. आनंदनगर झोपडपट्टी, मार्केट यार्ड), बालाजी सतीश गावलगडदे (वय २३), प्रसाद तानाजी फावडे (वय २३, दोघे रा. अंबिका झोपडपट्टी, शंकरशेठ रस्ता, स्वारगेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई शंकरशेठ रोडवरील अंबिका झोपडपट्टीमध्ये करण्यात आली. आरोपींकडून ३१ सिलिंडर, रोकड, वजन काटे, गॅस बिल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस नाईक विल्सन डिसोझा यांना शंकरशेठ रस्त्यावरील अंबिका झोपडपट्टीत एका खोलीत काही जण लाखबंद केलेल्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून काळ्या बाजारात विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांनी तेथे कारवाई केली. या कारवाईत ९ मोठे सिलिंडर, २२ छोटे सिलिंडर, रोकड, वजनकाटे, नॉब, रेग्युलेटर, पाना, स्क्रू ड्रायव्हर, गॅस बिले असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, विल्सन डिसोझा, संतोष क्षीरसागर, संदीप तळेकर, रामदास गोणते, सुजित पवार, कल्पेश बनसोडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी ही कारवाई केली.