अजित घस्ते/आशिष काळे
पुणे : कायम काेंडीचा, अपघाताचा मार्ग अशी ओळख बनलेल्या राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील एनडीए चाैक (चांदणी चाैक) आणि इतर रस्त्यांचे उद्घाटन अगदी थाटामाटात शनिवारी (दि. १२) झाले. यामुळे काेंडी फुटेल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल असे वाटत हाेते; परंतु प्रवास सुकर हाेण्याऐवजी गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचाच अनेकांचा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाेकमत’ने या मार्गाचा प्रवास करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असता, दिशादर्शक फलक दर्शनी भागात आणि माेठे नसल्याने हा महामार्ग प्रवाशांना गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचे दिसून आले.
तब्बल आठ रस्ते या चाैकात एकत्र येत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी काेणता रस्ता निवडावा यावरून गाेंधळ उडत आहे. चांदणी चाैकाचे ‘एनडीए’ चाैक असे नामकरण झाले. आधीचा हा चाैक पाडून नवीन बांधण्यात आला. पूल पाडण्यापासून त्याचे उद्घाटन हाेईपर्यंत त्याचा माेठा गवगवा झाला. या चाैकामुळे मुंबई व सातारा रस्त्यांवरील वाहतूक काेंडी कमी झाली असली तरी येथून आसपासच्या गावाला कनेक्ट हाेणारे रस्ते मात्र भुलभुलैया ठरताना दिसत आहेत; कारण काेणत्या रस्त्याने काेठे वळायचे आणि इच्छित स्थळी कसे पुढे जायचे याबाबत गाेंधळ उडत आहे. त्यामुळे वाहनचालक प्रत्येक पाॅइंटवर आता पुढे कसे जायचे या विचाराने रेंगाळताना दिसून येत असल्याचे रविवारी केलेल्या पाहणीत दिसून आले.
काेथरूडवरून भुगाव, मुळशीकडे जाताना...
काेथरूडवरून भुगाव व मुळशीकडे जुन्या मार्गाने उड्डाणपुलावरून जाताना एनडीए चाैकात इच्छित स्थळी कसे जायचे? याबाबत प्रवाशी तेथे थांबून सुरक्षारक्षकांना विचारत हाेते. भूगावला जाणारे दाेन मार्ग आहेत. एक मार्ग ३ किलाेमीटरचा वळसा मारून पुलावरून जाता येते. दुसरा मार्ग पुलाखालून आहे. त्यांपैकी प्रवासी मात्र जुना मार्ग असलेल्या फ्लायओव्हरवरून जाण्यास पसंती देतात. परंतु या मार्गाने जायचे असल्यास एनडीएच्या प्रवेशद्वारावरून वळसा मारावा लागताे. मात्र उड्डाणपुलाखालचा नवीन रस्ता साेयीचा असल्याचा दिसून आला.
भूगाव, मुळशीकडून पाषाणकडे जाताना...
या मार्गावर एक वळसा घेऊन एनडीए पुलावरून पाषाणकडे जाता येते. पुढे पूल ओलांडल्यावर एक सर्कल आहे. तेथून पुन्हा यू टर्न घेऊन काेथरूडच्या रस्त्याला लागता येते. काेथरूडला जाणाऱ्या या उड्डाणपुलावरून पुन्हा एनडीए चाैकाच्या पुलावर आल्यास मागून येणाऱ्या भरधाव वाहनांनी अंगावर काटा उभा राहताे. प्रत्येक रस्त्याच्या कनेक्टिंग पाॅइंटला असणारे दिशादर्शक फलक खूपच छाेटे असल्याने ते जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत. त्यामुळे येथे प्रचंड गोंधळलेली स्थिती निर्माण हाेते.
मंडपाचा अडथळा :
एनडीएकडून पाषाण व बावधनकडे जाताना मंडपाचा अडथळा आला. पुलाच्या उद्घाटनासाठी जाे मंडप उभारला आहे ताे रस्त्यातच असल्याने हा रस्ता बंद आहे. मंडप काढण्याचे काम सुरू असले तरी ताेपर्यंत नागरिकांची गैरसाेय हाेत आहे.
दिशादर्शक फलक फारच लहान :
प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक फारच छाेट्या आकाराचे आहेत. ते एकदम जवळ गेल्याशिवाय दिसत नाहीत. तर काही रस्त्याच्या एका काेपऱ्यात असल्याने तेथे फलक आहेत का? हेदेखील दिसत नाहीत. त्यामुळे चालक फलकाजवळ थांबून काेठे वळायचे याचा अंदाज घेताना दिसत आहेत.
अडचणी काय?
- लहान आकारातील दिशादर्शक फलक
- स्पीड ब्रेकरचा अभाव अन् मागून येणाऱ्या भरधाव वाहनांची भीती
या उपायाेजना आवश्यक :
- दिशादर्शक फलक माेठ्या आकारात असावे.
- प्रत्येक वळणाच्या आधी शंभर मीटरवर दिशादर्शक फलक हवे.
- सुरुवातीचे काही दिवस वाॅर्डनची नियुक्ती करायला हवी.
- रस्त्याच्या प्रत्येक कनेक्टिंग पाॅइंटवर स्पीड ब्रेकर बसवायला हवे.
काही निरीक्षणे -
- एनडीए चौक (चांदणी चौकात) तब्बल आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे बाहेरगावच्या वाहनचालकांना रस्ता समजणे अवघड जात आहे. त्यामुळे भूगाव, मुळशीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनचालकांचा गाेंधळ उडत आहे. प्रथम पौड रोडवरून बावधन, पाषाणकडे जायचे. त्यासाठी एनडीएकडून पुलावरून जावे लागते. बावधन, पाषाण रोडला लागल्यानंतर पुन्हा यू टर्न घेऊन मुळशीकडे जायचे असेल, तर गोंधळ उडतो. याठिकाणी धोकादायक वळसा घेऊन जावे लागते.
- मुळशी रोडला लागल्यानंतर पुन्हा यू टर्न घेऊन तुम्ही मुळशीहून आलाय, असे समजून कोथरूडला जायचे असेल, तर पंचरवरून यू टर्न घेऊन पुन्हा यावे लागते. कोथरूडच्या रस्त्याला लागल्यावर पुन्हा यू टर्न घेऊन एनडीएला अथवा मुळशी, मुंबईकडे जायचे असल्यास रोड लक्षात येत नाही.
- दुचाकीस्वारांना उजवीकडे वळायचे असेल, तर मागून येणाऱ्या वाहनांची भीती वाटते. विशेषत: कोथरूडवरून मुंबईकडे अथवा साताऱ्याकडे जाताना, तसेच मुळशीकडून साताऱ्याकडे जाताना वेगाने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वळणावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर हवेत.
- नूतनीकरण केलेल्या चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी. अर्थात, रविवारी याठिकाणी पाहणी केली असता मंडप आणि फ्लेक्स ‘जैसे थे’ हाेते.
नेमके घडले काय?
- मुंबई- सातारा व सातारा- मुंबई मार्ग पूर्वी दोन लेनचा हाेता, आता तीन लेनचा झाला.
- मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन्ही बाजूंनी दोन सेवा रस्ते आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी फुटली.
मुख्य हायवे रस्ता वाहतूक मुक्त झाला असला तरी भूगाव, मुळशी, बावधन येथील रहिवाशांना मात्र वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे साेयीचे हाेण्याऐवजी गैरसाेय हाेत आहे. पुलाचा वापर कसा होताेय, यावर भविष्य ठरणार आहे.
-महेंद्र कांबळे, बावधन रहिवासी