पुणे: समाजातील काही घटकांमध्ये कोरोनाबाबत भीती पसरली असून, या भीतीने काहींनी प्राणही गमावले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजातील ही भीती दूर करत जनजागृती करावी, असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी ‘एनएसएस’च्या विद्यार्थ्यांना केले.
युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पुणे महापालिका व पोलीस आयुक्तालय यांच्या समन्वयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळातर्फे ‘कोविड-१९ लसीकरण साह्य व जनजागृती पथनाट्य उपक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी गिरीश बापट बोलत होते.
विद्यापीठात आयोजित कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, एअर चीफ मार्शल भूषण गोखले, सहायक पोलीस उपायुक्त नितीश घट्टे, महाराष्ट्र व गोवा राज्यचे क्षेत्रीय संचालक डी. कार्थीगेन, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ. संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे उपस्थित होते.
विक्रम कुमार म्हणाले की, पुण्यात २२० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत १७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या लसीकरण केंद्रांवर गर्दी नियंत्रण, समन्वय, माहिती व जनजागृतीसाठी हे स्वयंसेवक मोठा हातभार लावतील, याची खात्री आहे.
---------
विद्यापीठातील विद्यार्थी हा या चार भिंतीतील विद्यार्थी नाही तर ‘समाज विद्यापीठातील’ विद्यार्थी आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठ समाजाबरोबर आहे. हा संदेश हे विद्यार्थी स्वयंसेवक देत आहेत.
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
------