पुणे : भारतावर मूठभर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विषवल्लीमुळे भारत कधीच एकसंध होऊ शकला नाही. दुभंगलेपणामुळे भारत सर्वगुणसंपन्न असूनही गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होऊ शकला नाही. भारताला एकसंध ठेवायचे असेल, तर जातीविरहित समाजनिर्मितीकडे आपली वाटचाल होणे महत्त्वाचे आहे. अभिजन आणि बहुजन यांतील अंतर कमी होणे ही काळाची गरज आहे, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. पुण्यातील साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी फुटाणे बोलत होते. फुटाणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. प्रमोद आडकर, अभिनेते शशिकांत खानविलकर उपस्थित होते. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी स्वागत केले.मिलिंद सुधाकर जोशी यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. कोणत्याही कामासाठी माणसाला प्रेरणा आवश्यक असते. अंत:प्रेरणा हीच खरी प्रेरणा असून, अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. समाज हे गुणवत्तेचे उद्यान आहे, या गुणवत्तेचा शोध घेऊन सन्मान केला पाहिजे.’
जातीविरहित समाजनिर्मिती व्हावी
By admin | Published: May 05, 2017 3:07 AM