पुणे: राज्यात डायलेसिस सेंटरची संख्या कमी असल्याने गरीब रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उपचार महाग असल्याने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे जिल्हा स्तरावरील धर्मादाय रुग्णालयाच्या सहकार्याने किंवा खासगी रुग्णालयांची मदत घेवून जिल्हा व तालूका स्तरावर डायलिसिस केंद्र उभारावेत, अशा सूचना राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिल्या आहेत.राज्यात अनेक जिल्ह्यात व तालुक्यात डायलिसिस केंद्र उपलब्ध नाहीत. डायलिसिससाठी लागणारा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात आहे.विश्वस्त संस्थांनी कायद्यानुसार गरीब रुग्णांना सेवा देणे आवश्यक आहे. धर्मादाय संस्थांचे पालनकर्ता म्हणून विविध धर्मादाय संस्थांमार्फत गरीब रुग्णांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देणे हा धर्मादाय कार्यालयांचा कामाचा भाग आहे.धर्मादाय कार्यालयांमार्फत प्रत्येक जिल्हा स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.या समित्यांच्या सहकार्यातून किंवा धर्मादाय व खासगी रुग्णालयांची मदत घेवून डायलिसिस केंद्र उभारण्यास प्रोत्साहन द्यावे,असे आदेश डिगे यांनी राज्यातील सर्व सहधर्मादाय आयुक्त कार्यालयांना दिले आहेत. डिगे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात व तालुका स्तरावर डायलिसिस सेंटर स्थापन करण्यासाठी व सेंटर कार्यरत राहण्यासाठी जिल्ह्यातील धार्मिक स्थळांकडून किंवा सामाजिक,शैक्षणिक संस्थाकडून निधी घ्यावा.मात्र,हा निधी घेताना कोणत्याही संस्थेवर दबाव टाकू नये. संबंधित निधी जिल्हा स्तरावरील समितीमार्फतच स्वीकारावा. जिल्हा स्तरावर समिती नसेल तर धर्मादाय रुग्णालयांमार्फत स्वीकारून त्याचा चोख हिशोब ठेवावा. त्याचप्रमाणे वाद असणा-या संस्थांमधून निधी घेवू नये. डायलेसिस सेंटर सुरू झाल्यानंतर गरीबांंना मोफत किंवा नाममात्र दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत.
गरिबांसाठी राज्यात डायलिसिस केंद्र उभारा : शिवकुमार डिगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 8:31 PM
गरीब रुग्णांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध करून देणे हा धर्मादाय कार्यालयांचा कामाचा भाग आहे.
ठळक मुद्देडायलिसिससाठी लागणारा खर्च सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर