छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे जगभरात कौतुक केले जाते. समाजातील अनेक व्यक्ती, तरुण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांचे कार्य, राजकारण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था याची माहिती घेतात. पण आपल्या वागणुकीत त्या गोष्टी आणत नाहीत. सद्यस्थितीत बेरोजगारी, महागाई यामुळे तरुण पिढीत नैराश्य वाढत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
पांडुरंग बलकवडे म्हणाले,
तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. आपण एखाद्या उद्योगात किंवा व्यवसायात कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो. यासाठी महाराजांच्या व्यवस्थेचा अभ्यास करावा. अन्याय करणाऱ्या लोकांशी संघर्ष करण्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी. यासाठी शिवाजी महाराजांनी भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण केला. आताच्या समाजाला भ्रष्टाचारमुक्त होण्याची गरज आहे.
तरुणांनी व्यवसाय उभा करावा यासाठी बलकवडे यांनी असे उदाहरण दिले की,
शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना ३३ गावांचा कारभारी म्हणून पाठवले होते. महाराजांनी त्याची ३३०० पेक्षा जास्त गावे केली. त्यांच्या बरोबर ५० सेवक दिले होते. तर १६८० च्या काळात स्वराज्य स्थापनेच्या सेवेत ५ लाख सेवक कार्यरत होते. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना ५ हजारची पुंजी दिली होती. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य खजिन्यात २ कोटी रुपये होते. आदर्श उद्योजकाची व्याख्या ग्राहकांचे हित, समाधान, पाहणे होय. त्याबरोबरच रयतेच्या सुखही पाहायला हवे. हा शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
..................
तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अशक्यप्राय परिस्थितीवर मात करून पुढे जायला हवे. सध्या समाजात नकारात्मक विचार करणे वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे ठरवले होते. ते पूर्णही करून दाखवले. तरुणांनी सध्याचा काळ जरी वेगळा असला तरी ठरवलेल्या गोष्टी पूर्ण कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराज शिस्तप्रिय होते. त्याप्रमाणे तरुणांबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिस्त आणि नियमांचे पालन करायला हवे. सध्या त्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे.
प्रदीप रावत
अध्यक्ष
भारत इतिहास संशोधक मंडळ