घोडेगाव : जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्राचा अभ्यास करून धोकादायक गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ठोस आराखडा तयार करा, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
पुण्यातील विधानभवनात जिल्ह्यातील धोकादायक गावांच्या पुनर्वसन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत वळसे पाटील यांनी वरील सूचना दिल्या. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्र निश्चित करून यामध्ये येणारी गावे, घरे यांच्या सुरक्षेचा व पुनर्वसनाचा सविस्तर आराखडा तयार करून ठोस उपाययोजना केल्या जाव्यात. तसेच दि. २१, २२, २३ जुलै रोजी झालेल्या पावसात नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे त्वरेने करावे. पावसामुळे खरडून गेलेल्या जमिनी, तुटलेले बांध, ताली यासंदर्भात पंचनामे करून जमिनी, ताली पूर्ववत करण्यासाठी पडकई व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावीत. लोकांना रोजगार देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे हाती घ्यावीत. तसेच रस्त्यांवर पडलेल्या दरडी घटविण्याचे व खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशा सूचना या बैठकीत वळसे पाटील यांनी दिल्या.
30072021-ॅँङ्म-ि06 - पुणे जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्र व अतिवृष्टीमूुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित दिलीप वळसे पाटील, सौरभ राव, डॉ. राजेश देशमुख व इतर.