लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क, जबाबदारी याची जाणीव होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवात संपूर्ण जिल्ह्यात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानामध्ये, प्रशासनाने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा विषय घेऊन विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय ‘उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा’ हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://pune.gov.in या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर या स्पर्धेची नियमावली देण्यात आलेली आहे.
----
अशी असेल स्पर्धा
- स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
- विषयाला अनुसरून केलेल्या सजावटीचे विविध कोनातून काढलेले पाच फोटो पाठवावेत.
- फोटो मूळ स्वरुपातील असावेत, त्यावर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिझाइन असे अधिकचे काही जोडू नये.
- प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त २०० केबी साइजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा.
- आपल्या सजावटीची ध्वनिचित्रफीत पाठवताना ती कमीत-कमी ३० सेकंदाची आणि जास्तीत जास्त एक मिनिटाची पाठवावी.
- -----
असे असेल बक्षीस
- प्रथम क्रमांक: २१,०००
- द्वितीय क्रमांक :- ११,०००
- तृतीय क्रमांक :- ५,०००/
- उत्तेजनार्थ:- १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे
८ सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्र देण्यात येईल.
----------