पुणे : जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठकीत चार जणांनी आपापले पर्यटन विकास आराखडे तयार करून सादर केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना अभ्यासपूर्ण एकच आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद, पीएमआरडीए, अतिरिक्त जिल्हाधिकारी व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी आपापले आराखडे दिले होते.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा पर्यटन विकास आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संजय जगताप, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार दिलीप मोहिते तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘केंद्र व राज्य शासनाने निधी दिला आहे त्याचे नियोजन करा. पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करा. पर्यटन विकासासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात कार्यशाळा घेऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.’’
खासदार सुप्रिया सुळे आणि ॲड. वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू होणारा पर्यटन विकास आराखडा हा प्रकल्प स्तुत्य असून, त्याबाबतीत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था असावी. तसेच पर्यटनाच्या ठिकाणी चुकीचे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. जुन्नर तालुक्याप्रमाणे अन्य तालुके पर्यटनस्थळे घोषित होण्याबाबत प्रयत्न करावेत, असेही पवार म्हणाले.
-----
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नाही
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ घेऊन जिल्ह्याचा विकास आराखडा तयार केला, यासाठी काही आमदारांना पण निमंत्रण दिले, पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांना मात्र या बैठकीसंदर्भात कोणत्याही प्रकारची कल्पनाच दिली नाही. कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर लगेच जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, पण अध्यक्षांना बैठकीचे निमंत्रण नसल्याने हाॅलमधून बाहेर पडावे लागले.