पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल) आणि अणुविद्युत आणि दूरसंचार (ई अॅण्ड टीसी) या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील पहिली चालकरहित, विद्युत चारचाकी गाडी तयार केली आहे. या गाडीचे अनावरण शुक्रवारी करण्यात आले.
या गाडीविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख व प्रकल्पाचे मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. गणेश काकांडीकर यांनी माहिती दिली.
याप्रसंगी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या यश केसकर, सुधांशू मणेरीकर, सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे आणि प्रेरणा कोळीपाका या विद्यार्थ्यांनी चालकविरहित, स्वायत्त, विद्युत, चारचाकी आणि चार आसनी बोल्ट - ऑन ऑटोनॉमस व्हेइकलचे प्रात्यक्षिक दाखविले.
गेल्या दशकामध्ये वाहन उद्योगात भरपूर वाढ झाली. जागतिकरणामुळे सुधारलेली अर्थव्यवस्था, बँकांच्या धोरणांमुळे सहज उपलब्ध होणारे कर्ज यामुळे चारचाकी वाहन केवळ स्वप्न न राहता मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात आले आहे.
यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालींचा वापर केला आहे, ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला ऊर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी वापरण्यात आली आहे, असे यश केसकर या विद्यार्थ्याने सांगितले.
या वाहनांची पावर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंगसाठी चार तासांचा वेळ लागतो, ज्यात चाळीस किलोमीटर प्रवास केला केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या वाहनांचे शेती, खाण, वाहतूक क्षेत्र इत्यादींमध्ये असंख्य अनुप्रयोग आहेत, असे सौरभ डमकले, शुभांग कुलकर्णी, प्रत्यक्ष पांडे यांनी सांगितले.
प्रा. प्रकाश जोशी म्हणाले, चालकविरहित स्वायत्त वाहन विद्यार्थ्यांनी प्रकल्पातून सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
प्रा. डॉ. गणेश काकांडीकर म्हणाले, अशा प्रकारच्या विद्युत वाहनांचा उपयोग मेट्रो स्थानकांना संलग्नित क्षेत्राशी जोडण्यासाठी, दळणवळणाकरिता, एअरपोर्ट, गोल्फ क्लब, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी करता येईल.
या प्रकल्प व्यवस्थापनासाठी प्रा. श्रीकांत यादव आणि प्रा. ओंकार कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव व इंजिनिअरिंगचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले.