पुणे : बंगाली भाषा शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, त्यांच्यासाठी ‘मराठी-बंगाली’ हा नवा शब्दकोश लवकरच भेटीस येत आहे. या शब्दकोशाचे वैशिष्ट्य म्हणजे, बंगाली शब्दोच्चार समजण्यासाठी कोशात हे उच्चार देवनागरी लिपीमध्ये दिले असून, त्यात जवळपास १५ हजार शब्दांचा समावेश आहे.
मराठी-बंगाली या शब्दकोशासाठी मराठी भाषेतील शब्दांचे संकलन करण्याचे काम २०१३ मध्ये हाती घेण्यात आले होते. आठ वर्षांत या शब्दकोशाचे काम पूर्ण झाले असून, हा शब्दकोश लवकरच प्रकाशित केला जाणार आहे. या शब्दकोशाची प्रमुख जबाबदारी संपादकीय मंडळातील डॉ. अपर्णा झा-मेहेंदळे (मुख्य संपादक), अनुराधा भद्र, स्वाती दाढे आणि माधव शाळिग्राम (कार्यकारी संपादक) यांनी पार पाडली आहे. या शब्दकोशाविषयी कार्यकारी संपादक स्वाती दाढे यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,‘‘काही वर्षांपूर्वी डेक्कन कॉलेजमध्ये काम करीत असताना एका मराठी लेखाचे बंगालीत भाषांतर करण्याचे काम आले होते. त्या वेळी ‘मराठी-बंगाली’ शब्दकोश मिळविण्याकरिता बरीच शोधाशोध केली. परंतु असा कोश कुठेही उपलब्ध झाला नाही. श्रीपाद जोशी यांनी अशा प्रकारचा कोश निर्माण केल्याचे ऐकिवात होते. पण तसा कोश मिळाला नाही. या अनुभवातून प्रेरणा घेऊन ‘मराठी-बंगाली’ शब्दकोश निर्मित करण्याची प्रेरणा मिळाली आणि कोशकार्याला प्रारंभ केला.
सुरूवातीला शब्दकोश करताना थोड्याफार अडचणी जाणवल्या. बऱ्याचदा मराठी मातीतले किंवा मराठी-संस्कृतशी संबधित शब्द बंगालीमध्ये मिळाले नाहीत. मग सविस्तर व्याख्या करून वाक्यरचना स्वरूपात प्रतिशब्द द्यावे लागले. उदा: मराठीमध्ये ‘थालीपीठ’ हा शब्द घेतला तर बंगाली लोकांना थालीपीठ किंवा मेतकूट असे बरेच शब्द अवगत नाहीत. मग ‘थालीपीठ’ म्हणजे कडधान्यांच्या पिठाची भाकरी असे सविस्तर लिहावे लागले. काही शब्द शोधणं अवघड होतं. पण ग्रामीण, बोली शब्द शोधण्यास बंगाली अभ्यासक डॉ. अपर्णा झा आणि अनुराधा भद्र यांची खूप मदत झाली. दुर्दैवाने संपादकीय मंडळातील अनुराधा भद्र आणि संगणकावर काम करणारे माधव शाळिग्राम यांचे निधन झाले. तो खूप मोठा आघात झाला. त्यामुळे प्रकाशन लांबणीवर पडले. तरी, या शब्दकोशाच्या प्रकाशनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन दाढे यांनी साहित्य संस्था आणि मराठी भाषाप्रेमी मंडळींना केले आहे.
--------------------------------------