पुणे : संगीताच्या नियमांच्या चौकटीत राहूनच मुक्त होता आले पाहिजे, तीच सर्जनशीलतेची वाट असते. सर्जनशीलता म्हणजे मनमानी नव्हे, असे सांगत, ‘आमच्या घराण्यात आहे तेच बरोबर, अशा भूमिकेमुळे शास्त्रीय संगीताच्या राग-रुपांमध्ये आज एकवाक्यता राहिलेली नाही. विरोध करणे, गोंधळ निर्माण करण्याचेच काम आज सुरु आहे. आपल्या ज्ञानाच्या पलीकडे संगीत शास्त्रात काही घडू शकते, हे त्यांना उमगतच नाही, अशा शब्दांत किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका यांनी शास्त्रीय संगीतातील सद्यस्थितीवर नेमकपेणाने बोट ठेवले. निदान संगीतकलेच्या विकासासाठी त्यांनी एकत्र यायला हवे. मानकीकरणासाठी पाऊल उचलायला हवे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
गानवर्धन संस्था आणि शारंग नातू प्रणित तात्यासाहेब नातू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार यावर्षी जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात गायिका व संगीत गुरू पंडित डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते रविवारी टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, मेवाती घराण्याचे गायक पं. संजीव अभ्यंकर, लता मराठे, शारंग नातू, प्रसाद भडसावळे उपस्थित होते. पुरस्कारानंतर पं.डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांची गायन मैफिल रंगली.
प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘संगीताचे प्रस्तुतीकरण आणि शास्त्र यांचे नाते बिंब-प्रतिबिंबासारखे असते. या नात्यात आज दुरावा निर्माण झाला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, झपाट्याने बदलणारी जीवनपध्दती, राजकीय अस्थिरता, सामाजिक उदासिनता, निष्क्रियता, बाहेरचे सांस्कृतिक आक्रमण या परिस्थितीत शास्त्रीय संगीत जपणे, जिवंत ठेवण्याचे आव्हान आजच्या कलाकारांसमोर आहे. एका व्यापक दृष्टीकोनातून प्रस्तुतीकरण आणि शास्त्राचा अभ्यास होणे, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय संगीताने जागतिक मंचावर निर्माण केलेले स्थान बळकट करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलायला हवीत. पुढची पिढी या दृष्टीने विचार करेल, अशी आशा वाटते.
सृजनात्मकतेने जपला सांगितिक वारसाआमच्या पिढीने ज्यांच्याकडे पथदर्शक म्हणून पहिले, त्या प्रभाताई ८७ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ८७ वर्षांचे आयुष्य मिळाले, तर कसे जगावे याचा आदर्श आमच्या पिढीने त्यांच्याकडून घ्यायला हवा. किराणा घराण्याच्या सांगितिक वारसा त्यांनी सृजनात्मकतेने जपला आहे. मी शाळकरी मुलगी असताना त्यांचा संगीतातील बहराचा काळ होता. प्रभाताई, किशोरीताई, शोभाताई अशा मोजक्याच स्त्री गायिकांना मी फॉलो करत होते. मी प्रभातार्इंकडे शिकायला जावे, अशी आईची इच्छा होती. जयपूर घराण्याशी माझे धागे जुळल्याने माझे आणि प्रभातार्इंचे ॠणानुबंध जुळले नाहीत. गुरुंनी दिलेल्या संगीताच्या संस्कारांचा तर्कसुसंगती, कलासक्ती आणि बुध्दीनिष्ठेने त्यांनी डोळस स्वीकार आणि संगोपन केले. त्यांनी कायम बुध्दीच्या कसोटीवर घासून कला जोपासली आणि शिष्यांकडे सुपूर्त केली. त्याच वाटेवरुन माझी वाटचाल व्हावी, एवढीच इच्छा आहे.- अश्विनी भिडे-देशपांडे
कला परस्पर पूरकचित्रकाराच्या दृष्टीतून चित्र अदृश्य संगीत असते आणि संगीतकाराच्या दृष्टीतून संगीत हे अमूर्त चित्र असते. संगीत आणि चित्रकलेचा अत्यंत जवळचा संबंध आपण समजून घ्यायला हवा. संगीत शास्त्राचा इतर कलांशी, विज्ञान-तंत्रज्ञानाशी जवळचा संबंध आहे. एकमेकांच्या मदतीनेच प्रत्येक कला पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत असते. म्हणूनच, संगीताचा अभ्यास वेगवेगळया दृष्टीकोनातून होणे आवश्यक आहे. - प्रभा अत्रे