लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सातत्याने वाढत असलेल्या स्टील व सिमेंटच्या किमतीची नोंद घेत या संदर्भात सरकारने स्वत: लक्ष घालावे, अशी विनंती करणारे निवेदन क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले.
क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर आणि क्रेडाईच्या कार्यकारी समितीचे सदस्य अश्विन त्रिमल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.
“गेल्या वर्षभराच्या काळात कोविड १९ मुळे सर्वजण अभूतपूर्व अशा परिस्थितीचा सामना करीत आहोत. बांधकाम क्षेत्रदेखील अनेक संकटांना सामोरे जात आहे. असे असूनही, गेल्या वर्षभरात सिमेंट व स्टीलच्या दरावर कोणाचेच नियंत्रण नाही. यामुळे बांधकाम व्यावसायिकांबरोबर घर घेणाऱ्या ग्राहकालाही भुर्दंड बसत आहे. त्यामुळे सिमेंट आणि स्टीलच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा,” असे निवेेदनात म्हटले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट म्हणाले, “सिमेंट आणि स्टीलच्या किमतीतली वाढ व्यापाराच्या दृष्टीने अनैतिक तर आहेच. यासोबत प्रतिबंधात्मक व्यापारी पद्धती देखील समजली जाते, हे महत्त्वाचे आहे. यात हस्तक्षेप करण्याची विनंती सरकारला आहे.”
सिमेंट आणि स्टीलच्या किमती वाढल्याने गृहखरेदीदार यात भरडला जात आहे. फायदा नसल्याने अनेक बांधकाम व्यावसायिक प्रकल्पाचे बांधकाम थांबवीत आहेत, ज्यामुळे प्रकल्पाच्या नियोजित तारखांना उशीर होऊन रेरा आणि इतर प्राधिकरणांतर्गत दंड बसून बांधकाम व्यावसायिकांसमोर आणखी समस्या उभ्या राहत आहेत. या सर्वांचा विचार करता सिमेंट आणि स्टीलच्या किमती स्थिर राहणे गरजेचे आहे, असेही पत्रात म्हटले आहे.
चौकट
अशी झाली भाववाढ
पन्नास किलो सिमेंटची किंमत जानेवारी २०१९ मध्ये ३६० रुपये होती. डिसेंबर २०२० मध्ये ती ४२० ते ४३० रुपये झाली. जानेवारी २०१९ मध्ये स्टीलची प्रतिटन किंमत ४० हजार रुपये होती. डिसेंबर २०२० मध्ये ही किंमत ५८ हजार रुपये झाली, असे निवेदनात म्हटले आहे.