चाकण : १९ लाखांच्या खंडणीसाठी हॉटेलचालकाचे अपहरण करून, पिस्तूल व कोयत्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार झाले आहेत, असे सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (दि. ६) सायंकाळी ७ ते रात्री सव्वा १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपी नारायण दाभाडे (वय २८, रा. कोटेश्वरवाडी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे), संतोष अशोक कुमावत (वय ४०, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे), राजू (पूर्ण नाव नाही) व एक अनोळखी इसम असा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भूषण भरत बेल्हेकर (वय ३२, रा. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी भूषण यांनी त्यांच्या मित्राची येलवाडी येथील २ एकर जमीन विकून दिल्याबद्दल त्यांना २० लाख रुपये मिळाले होते. चार जणांनी त्याला धमकावत पिस्तूल काढून भूषणच्या कपाळावर लावले व इतर तिघांनी कोयते व सत्तूर काढून तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने गाडीत बसवून सुदवडी भागात अंधारात नेले. धमकावून इंद्रायणी हॉटेल समोर नेले आणि शिवीगाळ करून मारहाण केली. या वेळी रस्त्याने पोलिसांची गाडी जाताना दिसली. त्यामुळे आधार सापडल्याने त्याने स्वत:ची सुटका केली व पोलिसात तक्रार केली. मारून टाकू व हॉटेल जाळून टाकू, अशी धमकी दिली व गाडीत बसून भंडारा डोंगराच्या रस्त्याने सर्व जण पळून गेले.
खंडणीप्रकरणी चौघांवर गुन्हा
By admin | Published: November 08, 2016 1:13 AM